आता शालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ, छगन कमळ बघ’, पवारांचा तत्कालीन फडणवीस सरकारला ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शालेय अभ्यासक्रमात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ या वाक्याचा समावेश करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन फडवणीस सरकारला टोला लगावला आहे. शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असा धडा बदलणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, माझ्यावर लहानपणापासून कमळ बघण्याचे संस्कार झालेले नाहीत. माझा जन्म झाला त्यावेळी सात दिवसांचा असताना आईच्या काखोटीतून स्कूल बोर्डाच्या मीटिंगला गेलो आहे. त्यामुळे मला कमळ कस दिसेल ? असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भरती संघटनेने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या अधिवेशनामध्ये शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना देखील मिश्किल टोले लगावले. संजय राऊत यांना दररोज सामनात चिमटे काढायला, टोले लगावायला आणि फटकारे मारायला कसं सुचतं असा प्रश्न होता. मात्र, आता त्याचे उत्तर मिळाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शाळा बंद करण्याचा निर्णय हा असंवेदनशील होता. शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देतानाच विचार केला पाहिजे. त्या सुरु केल्यानंतर त्यांना अनुदान न देणे, शाळा बंद करणे हे योग्य नाही. शिक्षकांचे प्रश्न खूप आहेत, ते सगळे लगेच सोडवता येणार नाहीत. मात्र, काही महत्त्वाचे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करु. त्याबाबत शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले
तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी गेली पाच वर्षे जसा संघर्ष करत होता. तसाच संघर्ष आम्ही सत्तेत राहून करत होतो. पाच वर्षात इतिहास बदलला, धडे बदलण्यात आले. मग आम्ही काय केले तर सरकारच बदलले. धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले, असे संजय राऊत यांनी सांगितले. प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची आवश्यकता होती असे लक्षात आले. हा धडा असा आहे, असेही राऊत यांनी म्हटले.