रायगडात शेकापच्या साथीने राष्ट्रवादी पुन्हा

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या मतदार संघात शिवसेनेकडून अनंत गीते, वंचित बहुजन आघाडीकडून सुमन कोळी, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सुनील तटकरे यांनी विजय मिळवला. सुनील तटकरे यांना अत्यंत चुरशीच्या लढतीत ३१,४३८ मतांनी विजय मिळला. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ मते मिळाली तर गीते यांना ४,५५,५३० मते मिळाली. या मतदार संघात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार आहेत. त्यापैकी ६१.७७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्या अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनी २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले होते. आता यंदा देखील रायगड लोकसभा मतदार संघात पुन्हा या दोघांमध्ये लढत झाली. ही लढत देखील अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत ३१४३८ मतांनी तटकरेंनी विजय मिळवला.

मागील निवडणुकीचा वचपा काढला
मागील निवडणुकीत शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती ; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र होते. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे. या मतदार संघात जरी शिवसेनेचा खासदार असला तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. त्याचेच फलित सुनील तटकरे यांना मिळले.