पुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 15 जुलैपासून NDRF ची पथके राहणार तैनात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन आणि वडनेरे समिती अहवाल बाबत सांगलीमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.

पहिल्यांदा संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नियोजन बाबत चर्चा पार झाली. त्यानंतर गतवर्षी आलेल्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा झाली. याबैठकीनंतर पाटील यांनी सांगितले की, संभाव्य पुराच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बर्‍याच वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटकमधील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. गत वर्षी आलेल्या पुरांचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे. हा अहवाल स्वीकारण्यासाठी वेळ लागेल.

मात्र या अहवालानुसार सरकार काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर संभाव्य पूर स्थितीबाबत प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय नदीकाठी 15 जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार आहेत, तर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सांगली, कोल्हापूर शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी वडनेरे समितीने सुचविलेल्या विविध उपाययोजनांचा महापालिकांनी बृहतआराखडा तयार करावा. यासाठी विशेष समिती गठीत करून तसा अहवाल तयार करण्याची सूचना त्यांनी केली.