नीरा-मोरगांव रस्त्याची खड्ड्यांंमुुळेे झाली दुर्दशा !, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा ते मोरगांव दरम्यानच्या रस्त्यावरील मोठ्-मोठ्ठे खड्डे झाल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांची डोकेदुखी वाढली असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नीरा – मोरगांव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

सातारा – नगर या राज्यमार्गावरून अवजड वाहणांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नीरा ते मोरगांव दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे वाहनचालकाला समजत नाही. वाहन चालकांची खड्डा चुकविताना डोकेदुखी वाढली आहे. मध्यंतरी मुरूमाने खड्डे बुजविले होते. मात्र,  गेल्या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी ने खड्ड्यातील मुरूम निघून गेल्याने पुन्हा खड्डे पडलेले आहेत.

बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या आठ – दहा महिन्यांपासून नीरा – मोरगांव रस्त्याचे डांबणीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या रस्त्याचे काम जेंव्हा होईल तेंव्हा होईल. मात्र सद्यातरी या रस्त्यावरील खड्डे खडी व डांबराने तातडीने बुजवावेत अशी मागणी नीरा, गुळूंचे येथील नागरिकांसह वाहनचालक करीत आहे.

दरम्यान , नीरा ते मोरगांव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाकरिता सुमारे ४५ कोटी रूपये खर्चून काम करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर हा रस्ता वाहनचालकांसाठी सुरक्षित होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी सांगितले.

नीरेतील बुवासाहेब ओढ्यावर नविन पुल बांधण्याची मागणी
नीरा – मोरगांव रस्त्यावरील ज्युबिलंट कंपनीच्या शेजारून वाहणा-या बुवासाहेब ओढ्याला गेल्या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे व अवजड वाहणांच्या वाहतुकीमुळे या पुलाच्या एका बाजुचा कठडा तुटला असून पुलाची दुरवस्था झाली आहे. एका वेळी दोन अवजड वाहने पुलावरून जाताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नीरेतील बुवासाहेब ओढ्यावर नविनच पुल बांधावा अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करीत आहे.

नीरा – मोरगांव रस्त्याचे काम मंजुर झाले असून दिवाळीनंतर निविदा प्रक्रिया पुर्ण करून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. नीरा येथील पालखी तळापासून हा रस्ता साडेपाच मीटरचा असून तो सात मीटरचा होणार आहे.
मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे पुर्व