दिल्ली अग्निकांड : ‘रिअल हिरो’ ! जीवाची परवा न करता ‘या’ फायरमननं 12 जणांचा वाचवला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाने मोठ्या साहसाने व प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले व अनेक लोकांचा जीव वाचवला. अग्निशामक दलाचे सहाय्यक विभाग अधिकारी राजेश शुक्ला आणि त्यांची टीम नसती तर दुर्घटना आणखी भयावह ठरली असती. रांची येथील राजेश शुक्ला आणि त्यांच्या टीमने 12 लोकांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवले. या कामात राजेश देखील जखमी झाले त्यामुळे त्यांना लोकनायक रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

घटनेविषयी राजेश शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात लागलेली आग तीन मजल्यांपर्यंत पोहचली होती. तेथे उपस्थित लोकांकडून माहिती मिळाली की काही लोक आतमध्ये अडकले आहेत. यानंतर त्यांनी कारखान्यात घुसून दोन ते तीन अग्निशमन दलाच्या जवानांसह दरवाजा तोडला आणि ऑक्सिजन सिलिंडर्सविना आत प्रवेश केला. बचाव कार्यादरम्यान, कारखान्याच्या आतल्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत पोहोचले. तेव्हा खोलीत दोन लोक वगळता सर्वजण बेशुद्ध पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्यांना बाहेर काढण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. तीन किंवा चार फायरमन एकत्र आले आणि त्यांनी दोन मुलांसह 12 जणांना बाहेर काढले.

लोकांना खोलीतून बाहेर काढताना श्वास घेताना शुक्ला यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात धूर गेला. त्यामुळे दुसऱ्यांदा लोकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजनच्या मदतीने त्यांनी आत प्रवेश केला. आतलं दृश्य खूपच हृदय विदारक होतं. त्याच हॉलमध्ये 30 हून अधिक लोक बेशुद्ध पडले होते. यापैकी बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला होता.

राजेश शुक्ला म्हणाले की, सर्वांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. मात्र तोपर्यंत घटनास्थळी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत दुर्घटनाग्रस्तांना स्वतःच्या गाडीने रुग्णालयात पाठवावे लागले. आग विझविणे आणि लोकांना बाहेर काढणे हे दुहेरी आव्हान होते. रस्ता इतका अरुंद होता की एकत्रितपणे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. यामुळे अग्निशमन दलाची वाहने ही आग विझविण्यास गुंतली होती, त्यावेळी पीडितांना उचलून रस्त्याच्या बाहेर रुग्णवाहिकेपर्यंत आणावे लागले. बचाव कार्यादरम्यान बेशुद्ध व्यक्तीला बाहेर काढताना ते पडले. यामुळे त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली.

दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी राजेश शुक्ला यांची रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. यानंतर जैन यांनी म्हंटले की, अग्निशमनचे जवान राजेश शुक्ला खऱ्या अर्थाने हिरो ठरले आहेत. त्यांनी आगीने घेरलेल्या इमारतीत प्रवेश करत लोकांचे प्राण वाचविले. अशा बहादूर नायकाला सलाम, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Visit : Policenama.com