२५ कोटीची माहिती देणाऱ्याचेच केले अपहरण ; मावळ, हडपसरमध्ये पैसे वाटण्यासाठी आल्याचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ व हडपसर परिसरात वाटण्यासाठी जळगावहून पुण्यात २५ कोटी रुपये घेऊन आलेल्यांची पोलिसांना माहिती देतो, असे म्हणून तरुणाचे ८ जणांनी अपहरण करुन लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी महेंद्र काशिनाथ पाटील (वय २५, रा. गजानन मंदिर, मुक्ताईनगर, जळगाव) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहिलखान, बबलू, आर. के., तेजस चव्हाण, मुन्ना व इतर ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे पनवेलचे संजय भाई यांचे असल्याचे आरोपींनी फिर्यादीला सांगितले होते.

याबाबत पोलिसांनी सांगितले की,  महेंद्र पाटील हे ऑनलाईन मार्केटिंगचे काम करतात. महेंद्र पाटील यांना त्यांचा गावाकडील मित्र डॉ. संदीप ठोसर यांनी जळगावहून पुण्याला २५ कोटी रुपये जाणार असल्याची माहिती दिली. त्यावरुन त्यांनी जळगावचे पोलीस उपाधीक्षक राजेश भागवत यांना कळविले होते. तेव्हा त्यांनी खात्री करुन घेण्यास सांगितले. त्यानंतर महेंद्र पाटील हे खराडी रक्षकनगर येथील मोर मॉलसमोरील कॉनेट लॉजमध्ये गेले. तेथे एका बॅगमध्ये २५ कोटी रुपये रोख असल्याचे फोटो व व्हिडिओ काढून पोलिसांना माहिती देतो, असे त्यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर त्यांनी पाटील यांचे अपहरण केले. राहिल खान व त्याच्या साथीदारांनी त्यांना खराडी, सासवड, कात्रज येथील विविध लॉजवर नेऊन मारहाण केली. त्यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. हे पैसे देण्यासाठी त्यांना लॉजमध्ये हातपाय बांधून कोंडून ठेवले. त्यांच्याकडील दोन मोबाईल, सोन्याची चैन, ब्रेसलेट, घड्याळ व एक कार असा ३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर त्यांची सुटका झाल्यावर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हे पैसे निवडणुकीत वाटण्यासाठी आले असल्याचे फिर्यादीचे म्हणणे असले तरी ते २९ एप्रिलपर्यंत पुण्यात कसे व ते कोणी पाठविले़ संजय भाई कोण, ते वाटले की नाही, असे अनेक प्रश्न उद्भवत आहे.