विखे पिता-पुत्रांचे ‘कारनामे’ लिखित स्वरुपात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द, मंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा अडथळा?

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – मावळते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे या पिता-पुत्रांनी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात नेमके काय-काय ‘कारनाने’ केले. पक्षविरोधी कशा पद्धतीने काम केले, याची लिखित स्वरूपातील निवेदनच भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यांनी पक्ष वाढीसाठी नव्हे, तर जिल्ह्यातील भाजप संघटन संपवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला, याचा लेखाजोखा त्यात मांडण्यात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विखेंचे हे कारनामे त्यांच्या मंत्रिपदाच्या शर्यतीतील मोठा अडसर ठरणार आहे.
जिल्ह्यात भाजपाची राजकीय ताकद वाढावी, यासाठी भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले. त्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपात घेऊन राज्याचे गृहनिर्माण मंत्रीपद दिले. मात्र बारा-शून्य अशी भाषा करून विखे कुटुंबीयांनी जिल्ह्यातील भाजप वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी स्वतःचा वैयक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी भाजप पक्ष संपवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला, याचे कारनामे पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात सुपूर्द केले आहेत. विखे यांचे हे ‘कारनामे’ त्यांच्या मंत्रीपदाच्या शर्यतीमधील मोठा अडथळा ठरणार आहेत.
शक्कल अंगलट येण्याची चिन्हे
विखे पिता-पुत्रांनी लढवलेली शक्कल त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात जिल्ह्यातील संपूर्ण भाजप पक्ष एकवटला आहे. जिल्ह्यातील सर्व भाजप नेत्यांकडून त्यांना जोरदार विरोध होऊ लागल्याने पक्षश्रेष्ठीही संभ्रमात पडले आहेत. यावर नेमके काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Visit : Policenama.com