हिऱ्यांच्या दागिन्यांचा अपहार करणाऱ्याला गुजरातमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हॉल मार्क तपासणी दिलेल्या ३९ लाखांचे दागिने कुठे तरी पडल्याचा बनाव करून ते लंपास करत पसार झालेल्या एका कामगाराला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने गुजरातमधील बडोद्यातून अटक केली. तर त्याच्याकडून एकूण २२ लाख ९० हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मयुर कन्हैयालाल शहा (वय ४७, रा. सिल्हर अपार्टमेंट सुधानपुरा बडोदा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

गीता नहार यांचा मुकुंदनगर येथे सुरज गार्डन कमर्शियल कॉम्पेलक्समध्ये रियल डायमंड अँड कंपनी नावाचे दुकान आहे. त्यांच्या शोरुममध्ये मयूर शहा हा मार्केटिंग मॅनेजर होता. त्याला ३० ऑगस्ट २०१८ रोजी नहार यांनी ३९ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दागिने हॉल मार्किंग आणि लॅब तपासणी साठी दिले होते. दरम्यान त्याने आपल्याला विषबाधा झाली आणि दागिने कुठेतरी पडले असल्याचा बनाव करून ते लंपास केले. त्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे युनीट ३ चे पथक तपास करत होते. त्यावेळी शङा हा बडोदा येथे असल्याची प्राथमिक माहिती पोलीस कर्मचारी मेहबुब मोकाशी आणि किशोर शिंदे यांना मिळाली. दरम्यान त्या माहितीवरून पोलिसांनी त्याला बडोद्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडून २२ लाख ९० हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले. त्याला न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी किशोर शिंदे, मेहबुब मोकाशी, राहूल घाडगे, मच्छिंद्र वाळके, गजानन गनबोटे, दत्तात्रय गरूड, अतुल साठे, संदिप राठोड, सुजित पवार यांच्या पथकाने केली.