मतदान केंद्राध्यक्षांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत अधिकाधिक प्रशिक्षण घ्यावे : राहुल द्विवेदी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र. १ यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात अधिकाधिक प्रशिक्षण घ्यावे, जेणेकरुन ऐन मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही आणि तक्रारी येणार नाहीत. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

येथील नियोजन समिती सभागृहात निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक युवराज नरसिंहन, पोलीस विभागासाठीच्या निरीक्षक भवानीश्वरी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक पराग नवलकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, कोषागार अधिकारी महेश घोडके आदींसह अहमदनगर सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. द्विवेदी म्हणाले, निवडणूकीच्या रिंगणात १९ उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्र. १ यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स हाताळणी सराव अधिकाधिक करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष हाताळणीमुळे मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.

सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची कामे आता वाढली असून निवडणूकीशी संबंधित प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे हाताळणे गरजेचे आहे. मतदानाच्या दिवशी वाढता उन्हाळा लक्षात घेता मतदानकेंद्रांवर पुरेशा सोई करणे आवश्यक असून औषधोपचार पेटी, मतदान केंद्रात पंखा किंवा कूलरची व्यवस्था आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने काही मतदानकेंद्रे ही सखी मतदान केंद्रे करण्याचे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु आहे. सहायक निवड़णूक निर्णय अधिकार्‍यांनी अशी केंद्रे कोणती करता येतील, यासंदर्भातील माहिती द्यावी. त्याचबरोबर राजकीय पक्षांनाही त्यांनी संबंधित केंद्रांवर महिला पोलींग एजंट ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रातही तेथील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तशी विनंती करावी, असे त्यांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशीच्या एक आठवडा आधीच मतदारांपर्यंत वोटर्स स्लीप पोहोचण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.