चाकण येथील 3 लाखांच्या लाच प्रकरणातील फरार आरोपीला अटक

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण पोलीस स्टेशन अंकित असलेल्या म्हाळुंगे पोलीस चौकी येथील पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांना तीन लाख रुपयांची लाच स्विकराताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ही कारवाई खराबवाडी रोडवर करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास आण्णासाहेब जाधव (वय-56) आणि पोलीस कर्मचारी भापकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या करावाई दरम्यान स्कॉर्पीओ चालक वैजनाथ गंगाधार मुगांवकर लाचेच्या रक्कमेसह पळून गेले. पळून जात असताना गाडीचा धक्का पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांना बसल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.

या गुन्ह्यातील फरार आरोपी वैजनाथ गंगाधार मुगावकर (वय -30 रा. मुपो धनगर गल्ली मुगांव ता. नायगाव, जि. नांदेड, सध्या रा. चाकण) याला आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे. आरोपीला आज विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (दि.22) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
तक्रारदार यांच्या विरुद्ध म्हाळुंगे पोलीस चौकीत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये न्यायालयात ‘क’ फायनल पाठविण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 7 लाख रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक जाधव याने 7 लाखापैकी 3 लाखांचा पहिला हप्ता मागितल्याचे निष्पन्न झाले. भानुदास जाधव याने लाचेची तीन लाख रुपयांची रक्कम पोलीस कर्मचारी भापकर याच्याकडे देण्यास सांगितली. भापकर याने स्कॉर्पीओ (एमएच 14 सीए 9444) चालकाला बोलावून घेत तक्रारदाराला खराबवाडी रोडवर लाचेची रक्कम गाडीत ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, विभागाच्या अधिकाऱ्यांनी चालकाला आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला असता चालकाने लाचेच्या रक्कमेसह तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांना गाडीचा धक्का बसल्याने ते जखमी झाले. तर पोलीस कर्मचारी भापकर हा दुसऱ्या गाडीतून तेथून पळून गेला. पथकाच्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पीओचा पाठलाग केला. मात्र, चालक गाडी सोडून पळून गेला. अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम, स्कॉर्पीओसह पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, पोलीस कर्मचारी भापकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com