‘हे’ ३ पोलीस स्टेशन लोकप्रतिनीधी चालवतात : ‘या’ माजी आमदाराचा हल्लाबोल

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – सोनई, शनिशिंगणापूर व नेवासा ही नेवासा तालुक्यातील तिन्ही पोलिस ठाणी लोकप्रतिनिधी चालवित आहेत. पोलिसही सुपारी घेऊन त्रास देतात, असा खळबळजनक आरोप माजी आमदार शंकराव गडाख यांनी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केला आहे.

मुळा एज्युकेशन सोसायटी जागेबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला आदेश व अटक वॉरंट या पार्श्वभूमीवर गडाख समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना माजी आ. गडाख म्हणाले की, सोनई, शिंगणापूर व नेवासा पोलीस ठाणी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडून चालवली जात आहेत. राजकारणासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. मी सराईत गुन्हेगार असल्यासारखा साध्या पकड वॉरंटसाठी स्थानिक गुन्हे शाखा व शेकडो पोलिसांच्या पथकाने नगर व सोनई येथील घराला गराडा घातला. घराची झडती घेतली. प्रशांत गडाख व विजय गडाख यांना आरोपीपेक्षाही वाईट वागणूक दिली. सुपारी घेऊन हे काम केले आहे.

मला किती त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी मी गप्प बसणार नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करीतच राहिल, असेही गडाख म्हणाले. गडाख यांनी पोलिस प्रशासनावर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.