‘कल्याण-मुरबाड’ चौपदरीकरण लवकर सुरू करण्याची मागणी

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – कल्याण-मुरबाड रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच माळशेज घाटातील साडेसात किलोमीटर बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, यासाठी भाजपचे खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. त्याचबरोबर शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे काम मंदगतीने होण्याबरोबरच काही ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामाकडे गडकरींचे लक्ष वेधले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण-नगर चौपदरी रस्ता, माळशेज घाटात बोगदा आणि शहापूर-मुरबाड-खोपोली नवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न केले होते. मात्र, ते काम अद्यापी सुरू न झाल्यामुळे कपिल पाटील, किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी काल दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच कल्याण-मुरबाड चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. कल्याणहून नगरमार्गे महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, बीड, परभणी शहराला जोडणारा हा महत्वपूर्ण महामार्ग आहे, याकडे नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले.

मुंबई-आग्रा आणि मुंबई-पुणे महामार्ग जोडणाऱ्या नव्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली महामार्गामुळे दळणवळण व विकासास चालना मिळणार आहे. मात्र, या रस्त्याचे काम मंदगतीने सुरू आहे. त्यातच काही ठिकाणी पुलांचे काम अपूर्ण असल्यामुळे दळणवळण ठप्प झाले होते. काही ठिकाणी रुग्णवाहिका व एसटी बस अडकल्या होत्या. त्याचा ग्रामस्थांना मोठा फटका बसला. काही ठिकाणी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करुन महामार्गाचे काम वेगाने करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार पाटील व आमदार कथोरे यांनी केली.