दुसऱ्या उमेदवाराला मत गेल्यास काय कराल ? ; जाणून घ्या..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यापूर्वीच्या मतदानात अनेकांनी आपण एकाला मत दिले असताना ते दुसऱ्याला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. अशी कोणा मतदाराची तक्रार असेल तर त्याची नोंद घेण्याची सोय निवडणुक आयोगाने कायद्यात केली आहे. मात्र, जर ही तक्रार खोटी ठरली तर जो तक्रार करेल, त्याला शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

याबाबत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर एखाद्या मतदाराने आपण एका उमेदवाराला मत दिले पण ते दुसऱ्या उमेदवाराला मत गेले, अशी तक्रार केली तर त्याची तेथील मतदान केंद्रावरील अधिकारी दखल घेतील. त्याला कायद्यातील तरतुद समजावून सांगतील. जर त्याची तक्रार खोटी ठरली तर त्याला ६ महिने शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकेल. त्यानंतरही त्याने आपली तक्रार कायम ठेवली तर मतदान केंद्र अधिकारी मतदान प्रक्रिया थांबवून त्याचे म्हणणे नोंदवून घेतील. व त्यानंतर सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमक्ष पुन्हा त्या मतदाराला पुन्हा मतदान करायला सांगितले जाईल. त्यात जर त्यांनी दिलेल्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या मतदाराला मतदान होत असल्याचे दिसून आले तर संपूर्ण मतदान प्रक्रिया थांबविली जाईल. जर तसे झाले नाही व त्या मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले. त्यालाच मत जात असेल तर त्या मतदाराने मतदान प्रक्रियेवर अविश्वास दाखविल्याबद्दल त्याला पोलिसांच्या हवाली केले जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

आजवर अनेक ठिकाणी लोकांनी दुसऱ्या उमेदवाराला मत दिले तरी ते भाजपच्या उमेदवाराला जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, अजूनपर्यंत तरी कोणी अधिकृतपणे अशा तक्रारी निवडणुक अधिकाऱ्यांकडे मतदान झाल्यानंतर केली नाही व आतापर्यंत मतदान प्रक्रिया थांबविण्याची वेळ देशभरात एकदा ही आली नाही.