वाकडेवाडी एस.टी स्थानकात प्रीपेड रिक्षा व्यवस्था करणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

वाहतूक कोंडी हटविण्यासाठी उपाय योजना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नव्याने सुरु झालेल्या वाकडेवाडी एस.टी स्थानकाजवळील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आणि प्रवाशांसाठी प्रीपेड रिक्षा व्यवस्था लवकरच उपलब्ध केली जाईल अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

वाकडेवाडी एस.टी. स्थानकाची पाहणी आ. शिरोळे यांनी आज शनिवार रोजी केली. त्यांच्यासमवेत पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कनवार तसेच एस.टी महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, पुणे महापालिका पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी शिरोळे यांनी प्रवासी आणि नागरिकांशी चर्चा केली.

मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथील एस.टी स्थानक वाकडेवाडी येथे नुकतेच हलविण्यात आले आहे. वाकडेवाडी येथील वाहतूक समस्या, एस.टी. स्थानकामधील सोयीसुविधांचा आढावा शिरोळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दुभाजक रचना बदलणे, पदपथ दुरुस्ती आणि वाहतूक पोलीस नेमणे असे निर्णय घेण्यात आले. प्रीपेड रिक्षा व्यवस्था, दुचाकींसाठी वाहन तळ करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

आरे दुध डेअरी येथील सेफ्टिक टँक आणि कचरा याच्या दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. तेथील कचरा तातडीने हलविणे आणि सेफ्टिक टँक स्वच्छ करण्याच्या सूचना आमदार शिरोळे यांनी दिल्या.

या प्रसंगी नगरसेवक आदित्य माळवे, राजश्री काळे, सोनाली लांडगे, पथ विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी, पी. डब्ल्यू. डी. चे बागुल साहेब, एस. टी. विभागाचे घोडे साहेब, गणेश बगाडे, गणेश नैकरे, सौरभ कुंडलिक उपस्थित होते.