सत्तेची मगरूरी आणि गैरकारभाराला मतदार कंटाळलेत : मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रचंड आर्थिक ताकद, सत्तेची मगरूरी आणि मागील पाच वर्षातील गैरकारभाराला कंटाळलेले मतदार, मोदी सरकारच्या दिखाऊ, खोट्या आणि प्रचारकी कार्यावर नापसंतीची मोहोर उठवतील असे म्हणत पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कॉंग्रेसचे तिकिट नक्की कुणाला दिले जाणार यासाठी सुरू असलेल्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर मोहन जोशी यांना अखेर कॉंग्रेसने तिकीट दिले. त्यामुळे निष्ठावंत आणि आयात अशा पेचात असलेल्या कॉंग्रेसचा तिढा अखेर सुटला आहे. त्यानंत मोहन जोशी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या निवडीबद्दल स्पष्टीकरण देत असतांनाच पक्षाचे आभार देखिल मानले आहेत. जोशी यांची लढत भाजपचे गिरीश बापट यांच्याशी होणार आहे.

मोहन जोशी म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणासाठीची लढाई असून, कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करून माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याची भावना पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

मागील ४० वर्षांहून अधिक काळ एक कामगार, श्रमिक पत्रकार, युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आणि पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जे कार्य केले आहे, त्याचा आणि कॉंग्रेस पक्षाच्या आणि आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच या निर्णयाने सन्मान झाला असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

दरम्यान, आजवर पक्षासाठी केलेले कार्य आणि पुणेकरांना ग्रासणा-या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि पक्का पुणेकर म्हणून असलेल्या माझ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यानुभव लक्षात घेता, पुणेकर मला पुणे शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करतील, असा विश्वास मोहन जोशी यांनी फेसबुकद्वारे व्यक्त केला आहे.