अजित पवारांनी ‘गमावलं’ की ‘कमावलं’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अक्षय भुजबळ) – कोणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुरुवातीला अनेकांना असे देखील वाटले की यामागे शरद पवारांचा हात आहे. मात्र शरद पवारांनी तत्काळ याचा खुलासा करत हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले.

त्यानंतररही अनेकांना ही शरद पवार यांचीच खेळी असू शकते अशी शंका येत होती. किंबहुना राजकीय वर्तुळात देखील तशीच चर्चा होती. मात्र त्यानंतर राज्यातील घडामोडींत मोठा वेग आला. राष्ट्रवादीने अजित पवारांचे गटनेतेपद काढून घेतले आणि सर्व अधिकार वळसे पाटील यांना दिले. तरीही अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण होते की अजित पवार हे भाजपसोबत गेले.

शेवटी सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी व्हावी असा निर्णय दिला आणि आपल्यासोबत एकही आमदार नसल्याचे लक्षात येताच अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला आणि भाजप सरकार कोसळले. त्यातच तयारीत असलेल्या महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा रस्ता मोकळा झाला. अजित पवार स्वगृही सुद्धा परतले. मात्र एक प्रश्न अनुत्तरीतच आहे एवढं सगळं करून अजित पवारांनी काय साध्य केलं किंवा काय मिळवलं ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काय गमावलं.

विश्वासाला गेला मोठा तडा
अजित पवारांच्या बंडाची बातमी आल्यानंतर कोणालाही या गोष्टीवर विश्वास ठेवणे अवघड जात होते की अजित पवार फुटले किंवा त्यांनी बंड केले. मात्र स्वतः शरद पवार यांनी त्याबाबत खुलासा केल्यावर अनेकांना विश्वास ठेवणे भाग पडले. मात्र परत आल्यावर अजित पवार तो विश्वास पुन्हा निर्माण करू शकतील का ? किंबहुना घरचा सदस्य असूनही अजित पवारांनी असे केल्याने भविष्यात त्यांच्यावर पक्ष किंवा इतर नेते कितपत विश्वास ठेवणार यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. ते पक्षात जरी परतले असले तरी त्याच्यावर सगळे कितपत विश्वास ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com