नोटाबंदीमुळे दोन कोटी नोकर्‍या गेल्या : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देशाला लुटणारांनी नोटबंदी, जीएसटी आणून नोकरी असणार्‍या दोन कोटी तरूणांच्या नोकर्‍या घालवल्या. अशा सत्ताधार्‍यांना पुन्हा जनतेने थारा देऊ नये. विदेशवारी करणार्‍या नरेंद्र मोदींना जर चौकीदार व्हायचे असेल तर त्यांनी चौकीदारीच करावी, पंतप्रधान होण्यासाठी खटाटोप करून निवडणूक लढविण्याची काय गरज ? असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जून सलगर यांच्या प्रचारार्थ बुधवारी दर्गाह मैदानावर प्रचारसभा झाली. या सभेस उमेदवार अर्जून सलगर, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, लिंगायत समाजाचे नेते शिवानंद एैबतपुरे, मिलींद रोकडे, धनंजय शिंगाडे, आण्णासाहेब पाटील, मुजीब काझी, अलंकार बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, भैय्यासाहेब नागटिळक, रमेश गंगावणे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, जनेतेने मोठ्या कष्टाने जमवलेला पैसा नोटबंदी करुन मोदींनी लुटला. महाराष्ट्रात सुरु असलेले परिवर्तन मोदींसह अन्य राजकारणांच्या पचनी पडत नाही. अशा लुटारुंना सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण दोन भावांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. यामुळे त्यांनी बहुजन समाजाला ओळखून सोडले आहे. परंतु आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. यामुळे घरातील ही सत्ता उलथवून टाका. तसेच सध्या देशातील राजकीय वातावरणही बदलल्याने मोदी वेड्यासारखे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले की, ज्या मुद्यावर मोदी देशाचे पंतप्रधान झाले. ते मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच राजकारण सुरु आहे. काही पुढारी मुस्लिम मते ही आमची जागीर असल्याचे सांगत होते. मात्र आता देशात परिवर्तन अटळ आहे.