पोलिसांची अशीही माणूसकी : हरवलेल्या आजीला २८ तोळे सोन्यासह नातेवाईकांच्या केले स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वयोमानामुळे विसरभोळा झालेला स्वभाव तसेच अंधारामुळे रस्ता चुकून नऱ्हे येथे आलेल्या एका आजीला नुकताच पोलिसांच्या माणूसकीचा प्रत्यय आला आहे. या आजीची आस्थेने चौकशी करून सिंहगड रोड पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. विशेष म्हणजे आजीच्या पिशवीत असलेल्या अठ्ठावीस तोळे सोन्यासह आजीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

सीताबाई बाबुराव बिनीवाले या ७५ वर्षाच्या आजींचा स्वभाव थोडा विसराळू आहे. त्यांना घर सापडत नसल्याने एका अनोळखी व्यक्तीने रात्री आठच्या सुमारास नऱ्हे पोलीस चौकीत आणून सोडले. शेजारच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. परंतु मला घर सापडत नाही. त्यामुळे मला घरी सोडा अशी विनंती आजीने पोलिसांना केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना आजीच्या नातेवाईकांना शोधण्याच्या सूचना दिल्या.

नऱ्हे चौकीतील पोलीस कॉन्स्टेबल गोरख चिनके यांनी आजीकडे चौकशी केली त्यावेळी आजीजवळच्या पिशवीत २८ तोळे सोने असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनाही त्यामुळे धक्का बसला. परंतु आजीने आपण यापुर्वी कसबा पेठेतील भोई आळीमध्ये राहावयास असल्याचे सांगितले. परंतु त्या मध्येच विसरत असल्याने काही समजत नव्हते. त्या सध्या नऱ्ह्यात राहात असल्याचेही सांगितले. परंतु काही समजत नव्हते.

तेव्हा त्यांनी मला तीन मुली असून मुलगा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी नातवांची नावे विचारली तेव्हा केतन भानारकर असे त्याचे नाव सांगितले. पोलिसांनी फेसबुकवर नातवाला शोधले. त्याचा फोटो दाखवला. त्यानंतर त्यांनीही त्याला ओळखले. तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल चिनके यांनी कसबा पेठ येथील आपल्या मित्रांशी संपर्क साधून सदर आजीबद्दल माहिती देऊन तिच्या नातेवाईक मिळतात का याबाबत विचारपूस करून आजीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिचा नातू केतन राजू भानारकर (वय २८, गोपीनाथ नगर , कोथरूड) यांच्या ताब्यात आजीला देण्यात आले. जाताना नातेवाईकांनी व आजीने पोलिसांचे आभार मानले.