भाजप खा. दिलीप गांधी यांच्या मुलाने नेला उमेदवारी अर्ज ; बंडखोरीचे अस्त्र कायम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – खा. दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करीत लोकसभेची निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विखे पिता-पुत्रांनी खा. गांधी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आज सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे सुवेंद्र गांधी यांच्या बंडखोरीचे अस्त्र अजूनही कायम असल्याचे दिसते.

विद्यमान खासदार असूनही पित्याला उमेदवारी नाकारल्याने सुवेंद्र गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप विरोधात बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जाहीर घोषणा केली होती. गांधी यांनी उमेदवारी केल्यास त्याचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे व त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा. गांधी यांच्या निवासस्थानाचे उंबरडे झिजविले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये यासाठी दोघांनीही विनंती केली. मात्र तरीही सुवेंद्र गांधी यांनी त्यांची भूमिका अद्याप बदललेली नाही. आज दुपारी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची खरेदी केली. सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने त्यांचे बंडाचे अस्त्र अजूनही म्यान झालेले नसल्याचे दिसते. गांधी यांच्या भूमिकेमुळे विखे पिता-पुत्रांची धाबे चांगलेच दणाणले आहेत.

मराठी क्रांती मोर्चाचे भोर यांचा अर्ज दाखल

मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक व शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भोर यांनी अर्ज दाखल केला आहे.