वाल्हे येथील विद्युत रोहित्राला दिवसाढवळ्या सुरुंग

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन –  एकिकडे वीज चोरीला आळा बसावा यासाठी महावितरणच्या वतीने
‘वीज चोरी कळवा बक्षीस मिळवा’ हा उपक्रम राबवला जात असताना याउलट वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील वीज मंडळातील कर्मचाऱ्यांच्याच वरदहस्तामुळे गोपाळ वस्तीजवळील विद्युत रोहीत्राला वीज चोरट्यांकडून दिवसाढवळ्या सुरुंग लावला जात असल्याची चर्चा आहे.

पुणे-पंढरपूर महामार्गावर वाल्हे एस.टी. स्टँडजवळील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पट्ट्यातील बेनामी जागेत अनेकांनी व्यवसायासाठी टपऱ्या टाकल्या असून त्या लगत गोपाळ व डोंबारी समाजाच्या शेकडो झोपड्या देखील आहेत. मात्र येथुन जवळच असणाऱ्या मदनेवस्ती, चव्हाणवस्ती, सपकाळवस्ती, धनगरवाडा तसेच भवानी माता मंदिराला अधिकृतरित्या विद्युत पुरवठा करण्याच्या हेतूने गोपाळ वस्तीलगत असणाऱ्या रेल्वे पुलानजीक छोटेसे विद्युत रोहित्र वीज मंडळाकडून बसविण्यात आले आहे.

परंतु या रोहीत्राचा दरवाजा बाहेरून बंद दिसत असला तरी खालून मात्र संपूर्ण रोहित्रच उघडे असल्याने वीज चोरांनी नामी शक्कल लढवत रोहित्रातील फ्युज मध्ये वायरी जोडून दिवसाढवळ्या वीज चोरीचा सपाटा लावला आहे. तर या भागासह गावठाणातही अनेक जणांनी वीजेच्या मीटरमध्येच छेडछाड करत वीज वितरणालाच चुना लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत या रोहित्रासह वाल्हे गावठाण तसेच वाल्मिक वस्तीतून जवळपास लाखो रुपयांची वीज चोरीला गेली असताना वीज मंडळाचे कर्मचारी मात्र वीज चोरांच्या संपर्कातच असल्याने प्रामाणिक वीज धारकांसह ग्रामस्थांनी वीज वितरणाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून वीज चोरांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवक कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस राहुल पवार यांसह सईद पठाण व पुनमशेठ पवार यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/