अग्रलेखाचा ‘बादशहा’ हरपला ! संपादक नीळकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखाचा बादशहा अशी ओळख असणारे संपादक नीळकंठ खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल १९३४ रोजी झाला होता. ते अर्थशास्त्रात बी़ ए़ झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि केसरी चे माजी संपादक कृ़. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर हे उत्तम मुलाखतकार होते. दैनिक नवाकाळचे ते अनेक वर्षे संपादक होते. त्यांच्या काळातच नवाकाळ हे वृत्तपत्र अग्रलेखाचा बादशहा म्हणून नावारुपाला आले.

नीळकंठ खाडिलकर यांनी आपल्या लिखाणातून मुंबईकरांच्या भावना सातत्याने मांडल्या. तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करुन वाचकांचे प्रबोधनही ते करीत असत. सामाजिक, राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विचारप्रवर्तक लेखनातून आपल्या वाचकांना मत बनविण्यास सहाय्य करीत असत. प्रामुख्याने कामगार व दलित, उपेक्षित वर्ग हा त्यांच्या अग्रलेखाचा चाहता होता.

Visit : Policenama.com