‘राणेंवर टीका करत केसरकर झाले मोठे, शिवसेनेतही गांभीर्यानं दखल नाही’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –  ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नव्हती, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले, अशी टीका करणाऱ्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचा माजी खासदार नीलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. कोरोनादरम्यान स्वतःच्या मतदारसंघातून गायब झालेले आमदार दीपक केसरकर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्गच्या राजकारणातून कायमचे गायब होतील, असे प्रत्युत्तर राणे यांनी दिले आहे.

नीलेश राणे म्हणाले, “दीपक केसरकर यांना आता शिवसेनेतही गांभीर्याने घेतले जात नाही. त्यांची अवस्था निवडणुकीनंतर शिवसेनेत काय झाली, त्यांची काय किंमत आहे, हे नागरिकांनी पाहिले आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर जसे कोरोनादरम्यान केसरकर एक वर्ष गायब होते त्याचप्रमाणे सिंधुदुर्गच्या राजकारणातून कायमचे गायब होतील, याची खात्री मी तुम्हाला देतो.”

“कोरोनाला घाबरून ते उंदरासारखे मुंबईत लपून बसले. मतदारांना त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. एक साधा मास्क अथवा सॅनेटायझरची बॉटल त्यांनी स्वखर्चातून मतदारांना दिली नाही, असा माणूस दुसऱ्यावर टीका करतो, ते पण नारायण राणे यांच्यावर. केसरकरांनी आयुष्यभर राणेंवर टीका केली. नारायण राणे यांचे नाव घेऊन मोठे झाले, मंत्री झाले. नारायण राणेंमुळेच त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली, म्हणून अशा माणसाला आम्ही गंभीरपणे घेत नाही,” असा निशाणा नीलेश राणे यांनी केसरकारांवर साधला.

काय म्हणाले होते केसरकर ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबाबत बोलतात, मात्र त्यापूर्वी त्यांनी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला होता. ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ होण्याची पात्रता नव्हती, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का, अशी विचारणा देखील केसरकर यांनी केली होती.