निर्भया केस : फाशीच्या धास्तीनं दोषी विनयनं कारागृहातच डोकं घेतलं आपटून, तुरूंग रक्षकानं वेळीच आवरलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भयाचे मारेकरी आता भयभीत होऊ लागले आहेत. फाशी टाळण्याचे बहुतांश पर्याय संपत आल्याने त्यांना आता मृत्यू समोर दिसू लागला आहे. यातील चार दोषींपैकी विनय शर्मा याने 16 फेब्रुवारीला तिहार कारागृहातील भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने वेळीच विनयला आवरल्याने त्याला जास्त दुखपत झाली नाही. परंतु, त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली. या घटनेनंतर सर्व दोषींच्या सुरक्षेबाबत कारागृह प्रशासन सतर्क झाले आहे.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निर्भयाचे मारेकरी आता जास्त आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तिसर्‍यांदा डेथ वॉरंट जारी झाल्याचा हा परिणाम असू शकतो, असे प्रशासनाने म्हणणे आहे. यापूर्वी त्यांची वागणूक चांगली होती. परंतु, आता त्यांची वर्तणूक आक्रमक झाली आहे. साध्या-साध्या गोष्टींवरून ते भडकत आहेत. शिवाय त्यांचे बोलण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. विनयने कारागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतल्यानंतर कारागृह प्रशासन आणखी सतर्क झाले असून सर्व दोषींच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. विनयसह इतर दोषी स्वत:चे नुकसान करून घेऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही फूटेजवरून तुरुंग कर्मचारी लक्ष ठेवत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दोषींना डेथ वॉरन्ट जारी झाल्यानंतर कारागृह प्रशासनाचा आपल्याशी व्यवहार बदलला आहे, असे दोषींना वाटू शकते. यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. अशा परिस्थितीत संधी मिळाल्यास तुरुंग अधिकारी या दोषींशी चर्चा करतात. तसेच डेथ वॉरन्टमुळे गंभीर झालेले वातावरण समान्य ठेवण्याचे प्रयत्न देखील कारागृह प्रशासन करत आहे.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विनयने सेलमध्ये भिंतीवर डोके आपटल्यानंतर आता अन्य दोषी अक्षय, पवन आणि मुकेश यांच्यावरही विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या सेलसमोर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आक्रमक झालेल्या दोषींना शांत करण्यासाठी त्यांचे सतत समुपदेशन करण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात आहे. त्यांची मानसिक स्थिती सामान्य रहावी यासाठी प्रशासन ही काळजी घेत आहे. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणीही केली जात आहे.

फाशीपूर्वी दोषींचे आरोग्य महत्त्वाचे
कारागृहाच्या नियमानुसार, दोषीचे आरोग्य ठीक नसल्यास त्याला फाशी देता येत नाही. फाशीवर चढवण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर त्यांना त्यांनी केलेला गुन्हा आणि शिक्षा याबाबतीत सर्व माहिती दिली जाते. आपण काय केले आहे याची त्याला जाणीव व्हावी, हा यामागील हेतू असतो. फाशी देण्यापूर्वी दोषींचे आरोग्य पूर्णपणे सामान्य असले पाहिजे. दोषी शारीरिक, तसेच मानसिकदृष्ट्या उत्तम असला पाहिजे. फाशीवर चढवण्यापूर्वी दोषीने संपूर्ण प्रक्रियेचा सामना केला पाहिजे, असा यामागील उद्देश असतो.