नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री ! NDA च्या नेतेपदी निवड, उद्या शपथविधी सोहळा

पोलीसनामा ऑनालाईनः राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) नेतेपदी जेडीयूचे नेते नितीश कुमार (JD(U) Chief Nitish Kumar ) यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या नावावर पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब ( next Chief Minister of Bihar) झाले आहे. एनडीएची बैठक रविवारी पार पडली असून त्यात नितीश कुमार यांची नेतेपदी निवडीचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (दि. 16) सकाळी साडेअकरा वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असे स्पष्ट केले असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगल होते. यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचेही त्यांनी म्हटल होत. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजपा, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टीचे (व्हीआयपी) नेते उपस्थित होते.

बिहारमध्ये एनडीएने 122 जागासहित बहुमत मिळवले आहे. भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे 2015 मध्ये 71 जागा मिळाल्या होत्या. तिथे यावेळी केवळ 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाच्या जागा मात्र 53 वरुन 74 वर गेल्या आहेत. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.