सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपुर्वी पगार देण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती, शासनानं काढली अधिसूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी दिवाळीचा सण लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये होणारा पगार आठ दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला होता. शासनाने तसा GR काढला होता. मात्र, आता महाराष्ट्र शासनाने दिवाळीपूर्वी होणारा पगार होणार नसल्याचे सांगितले आहे. पगार होणार नसल्याचा GR शासनाने शुक्रवारी (दि. 11) काढला आहे.

शासनाच्या पहिल्या निर्देशानुसार सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार होते. तसेच याचा फायदा पेन्शनधारकांनाही मिळणार होता. मात्र, दिवाळीपूर्वी राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी कोषागारातील अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाचा अभावामुळे दिवाळीपूर्वी पगार करणे शक्य नसल्याचे नव्याने काढलेल्या GR मध्ये म्हटले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहिन्याला 1 तारखेला पगार दिला जातो. मात्र यंदा दिवाळी सण महिनाअखेरीस आल्याने कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आठ दिवस आधीच म्हणजे 24 ऑक्टोबरला पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु निवडणुकीच्या कामकाजामुळे शासनाने यापूर्वी घेतलेला निर्णय रद्द करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com