राजकारणात निवृत्तीचे वय निश्चित केले जाऊ शकत नाही : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

इंदूर : वृत्तसंस्था – राजकीय क्षेत्रासाठी निवृत्ती वय निश्चित केलं जाऊ शकत नाही असे म्हणत भाजप नेत्या व लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले. उमेदवारी जाहीर न केल्यानं नाराज झालेल्या महाजन यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे.

भाजपने ७५ वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. या धोरणाच्या आधारे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारीपासून वंचित रहावे लागले. सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग ८ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. सध्या त्यांचे वय ८० वर्षे असल्याने पक्षाच्या धोरणात त्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. परंतु, यांची इंदूरमध्ये लोकप्रियता लक्षात घेता त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते. त्यामुळे पक्षाकडून इंदूरच्या उमेदवारीचा निर्णय लांबवण्यात आला. यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला.

या सर्व घडामोडींनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुमित्रा महाजन म्हणाल्या की, ‘राजकीय क्षेत्रासाठी निवृत्ती वय निश्चित केलं जाऊ शकत नाही. मोरारजी देसाई वयाच्या ८१ व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले होते. वयोमर्यादेचा हा निर्णय पक्षाच्या कधीच्या बैठकीत झाला, हे मला माहीत नाही. याबाबत पक्षाध्यक्षच बोलू शकतील. पक्षाने असं धोरण निश्चित केलं असेल तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्याचं पालन करावं लागेल. राजकारणातून निवृत्त व्हावं इतकी मी थकलेली नाही. त्यामुळे मी आजही भाजपचं काम करत आहे आणि यापुढेही पक्षाचं काम करत राहणार.’

राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही. सरकारी नोकरीसाठी निवृत्तीचं वय आधीच निश्चित असतं. ते वय गाठल्यानंतर तुम्हाला निवृत्त व्हावं लागतं मात्र, राजकारणात असं होत नाही. राजकारणात तुम्ही थेट जनतेशी जोडलेले असता. त्यांच्या सुख-दु:खात तुम्ही सहभागी होता. त्यामुळेच तिथे घड्याळाकडे पाहून काम करण्याची, साचेबद्ध जीवन जगण्याची मुभा नसते. असेही त्या म्हणाल्या.

भाजपने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांना वयाचे कारण देऊन लोकसभेची उमेदवारी नाकारली. त्यातच राहुल गांधी यांनी राजकारणातून निवृत्ततेचे वय ६० असावे असे म्हंटले आहे. त्यामुळे राजकारणातून निवृत्तीचे वय नक्की किती असावे हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like