‘कोरोना’ महामारीच्या काळात ‘तानाशाह’ किंग जोंग ‘अण्वस्त्रे’ वाढवण्याच्या तयारीत !

प्योंगयांग : वृत्तसंस्था – उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी लष्करासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली असल्याचे समोर आलं आहे. या बैठकीत उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आणखी बळकटी देण्याची योजना आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. अमेरिकेसोबत शांतता चर्चा बस्तानात गेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत.

सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सत्तारूढ वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय लष्कराच्या आयोगाची बैठक झाली. या बैठकीत किम जोंग उन स्वत: हजर होते. जवळपास तीन आठवड्यानंतर किम यांनी उपस्थिती दाखवली आहे. या बैठकीत सुरक्षा दलाला अधिक मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आल्याचे समजतेय. त्या शिवाय उत्तर कोरियाच्या विरोधी देशांकडून निर्माण करण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या आव्हानांना कसे तोंड देता येईल यावरही चर्चा करण्यात आली.

उत्तर कोरियाने एप्रिल महिन्यात क्षेपणास्त्र चाचणी केली होती. त्यानंतर किम यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर किम हे दोन-तीन आठवडे अज्ञातवासात होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची उलटसुलट चर्चा सुरु होती. अखेर एक मे रोजी एका खत कारखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते लोकांसमोर आले आणि चर्चेला पूर्ण विराम दिला. हा खत कारखाना कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मदतशीर ठरणार असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेसोबत उत्तर कोरियाची चर्चा सुरु होती. यामध्ये उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमांबद्दलही चर्चा होणार होती. त्यानंतर ही चर्चा निष्फळ ठरली.

दरम्यान, रशिया आणि चीनला इशारा देण्यासाठी अणुचाचणी करण्याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 15 मे रोजी चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. अमेरिकेने 1992 नंतर अणुचाचणी केलेली नाही. रशिया आणी चीन यांनी नुकतीच कमी क्षमतेची अणुचाचणी केल्याचे वृत्त असून, दोन्ही देशांनी त्याचा इन्कार केला आहे. जर अमेरिकेने अणुचाचणी केलीच, तर जगात पुन्हा अण्वस्त्रस्पर्धा होण्याची भीती या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.