५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी सहकारनग क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश मनोहर टेळकर (वय ५३, आरोग्य निरीक्षक, धनकवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी आंबेगाव पठार येथे दोन गाळे भाड्याने घेतले होते. या गाळ्यांना ड्रेनेज लाईन नाही. व कमर्शियल लाईट मीटर नाही. या कारणावरून पुणे महानगरपालिकेकडून कारवाई न करण्यासाठी धनकवडी -स सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक अविनाश टेळकर यांनी त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात अँटी करप्शनकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केल्यावर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर टेळकर याच्याविरोधात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शनच्या पथकाने केली.

एखाद्या लोकसेवकाने अशा प्रकारे लाच मागितल्यास यासंदर्भात अँटी करप्शनच्या टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.