पुणे एटीएसमधील पोलीस उपनिरीक्षकाचा ‘दहशतवाद’ ; दोन अभिनेत्रींसह चौघांवर गुन्हा

सराईत गुन्हेगारासह खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपटातील सहकलाकाराविरोधात अभिनेत्रीने वानवडी पोलीस ठाण्यात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मिटविण्यासाठी त्याला एका सराईताच्या कार्यालयात बोलवून १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन अभिनेत्रींवर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

राम भरत जगदाळे (पर्वती पायथा, सहकारनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पुणे एटीएसमधील पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (स्वारगेट पोलीस लाईन), रोल नं १८ चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व तिची मैत्रिण सारा श्रावण उर्फ सारा गणेश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (२८, शास्त्री रोड) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २८ सप्टेबर २०१८ रोजी जगदाळे याच्या कार्यालयात घडला होता. यादव यांनी याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांत तसेच पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन राम जगदाळे याला अटक केली आहे.

crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यादव यांनी रोल नं १८ या मराठी चित्रपटात रोहीणी माने हिच्यासोबत काम केलेले आहे. मात्र रोहिणी माने हिने सुभाष यादव यांच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकऱणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तो गुन्हा मिटविण्यासाठी रोहिणी माने, पोलीस उपनिरीक्षक टेकाळे, सारा श्रावण यांनी राम जगदाळे याच्या मदतीने सुभाष यादव यांना त्यांच्या नातेवाईकांसह जगदाळेच्या कार्यालयात बोलवले. २८ सप्टेबर रोजी सुभाष यादव तेथे गेले. त्यावेळी जगदाळे याने सुभाष यादव व त्याच्या नातेवाईकांना ३ तास कार्यालयात थांबवून ठेवले. रोहिणी माने हिचे पाय धरून माफी मागायला लावली. त्यानंतर त्याचे चित्रिकरणही केले. त्यासोबतच १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यावेळी सुभाष यादव यांनी १ लाख रुपये दिले. ते पोलीस उपनिरीक्षक टेकाळे यांनी स्विकारले. सारा श्रावण ही दुबईमध्ये होती. सुभाष यादव यांनी उर्वरित रक्कम न दिल्याने त्यांनी माफी मागताना चित्रित केलेला व्हिडीओ सारा श्रावण हिने व्हायरल केला. त्या दिवशी राम जगदाळे याने सुभाष यादव यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची तसेच अ‍ॅसीड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर सुभाष यादव यांनी पुणे ग्रामीण पोलिस तसेच पुणे शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर चौघांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेकडून राम जगदाळे याला अटक करण्यात आली आहे. राम जगदाळे हा सराईत असून त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.