पुणे महानगरपालिकेत नोकरीच्या अमिषाने साडेतीन लाखांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याच्या अमिषाने एकाने साडेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल दामोदर पैठणकर (वय ७४, रा.गुरुवारपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निशीकांत दत्तात्रय यादव (पुण्याई नगर धनकवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला निशिकांत यादव याने पुणे महानगरपालिकेत लिपीक पदावर नोकरी लावतो अशी बतावणी केली. त्यावेळी त्याने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून साडेतीन लाखांची मागणी केली. त्यानंतर नोकरी लावली नाही. म्हणून त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्याने दोन चेक दिले. मात्र त्याच्या खात्यात पैसे नसल्याने ते वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.