विवाहितेची बदनामी करण्याची धमकी देऊन २ लाखांची खंडणी मागणारा अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या मुलीबरोबर माझे अनैतिक संबंध होते, असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन अशी धमकी देऊन महिलेकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

समीर चंद्रकांत सुर्वे (वय ३०, रा. ओम शांती होम्स सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, पुणे, मुळ भोंगवली ता. भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५४ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० जानेवारी ते ८ एप्रिल दरम्यान घडला.

फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. असे असताना समीर सुर्वे हा सतत तिच्या घरी जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. व तिच्या मनास लज्जा होईल असे वर्तन केले आहे. समीर याने फिर्यादी यांना फोन करुन तुमच्या मुलीकडे माझे दोन लाख रुपये आहेत. ते मला द्या, नाही तर मी तुमच्या मुलीचे व माझे लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते असे सगळीकडे सांगून तिची बदनामी करीन, असे म्हणून पैशांची मागणी केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन समीर सुर्वे याला अटक केली आहे.