सशस्त्र दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जखमी

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ७ दरोडेखोरांनी हल्ला चढविला. दरोडेखोरांनी घरातील सर्वांना मारहाण करीत ४ ते ५ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

दरोडेखोरांनी वना शेवरे यांचा मुलगा मनोज शेवरे याच्या डोक्यात टॉमीने वार केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी घरातील सर्व कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत आणखी दागिने कोठे आहेत, अशी विचारणा करीत घरातील लोकांना मारहाण केली.

पोलिसांशी संपर्क करता येऊ नये, यासाठी दरोडेखोरांनी घरातील चारही मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर पळून जाताना त्यांनी ते वाटेत फेकून दिल्याचे आढळून आले आहे. दरोडेखोर हे हिंदी भाषेत बोलत असून त्यांनी बनियन आणि हाफ पॅट घातली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली असून संपूर्ण तालुक्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.