मिठाईच्या बॉक्समध्ये 10 लाख रुपये सापडले, महिला सफाई कर्मचाऱ्याने केले परत, प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – दिल्ली येथील महापालिकेच्या एका महिला स्वच्छता कर्मचा-याने मिठाईच्या डब्यात मिळालेले 10 लाख रुपये परत करून प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर ठेवले आहे. समाजामध्ये अजुनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे हे या महिला कर्मचा-यांने सिध्द करून दाखवले आहे. तीच्या या प्रामाणिकपणाचे सवर्त्र कौतुक होत आहे. लवकरच या महिला सफाई कर्मचा-याचा सत्कार दिल्लीचे महापौर निर्मल जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रोशनी असे या महिला सफाई कर्मचा-याचे नाव असून त्या दिल्ली महापालिकेत कायमस्वरुपी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे त्या सकाळी झाडूने स्वच्छता करत होत्या. त्यावेळी क्रांतीनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना मिठाईचा बॉक्स असलेली पिशवी दिली. त्यात दिवाळीची मिठाई आहे, असे त्या ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. रोशनी यांनी ती पिशवी घेऊन घरी आल्या तेंव्हा त्यांनी ती पिशवी उघडली तर त्यात नोटांचे बंडल पाहून त्यांना धक्काच बसला. त्यात तब्बल 10 लाख रुपये असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी कर्मचा-याने तातडीने स्वच्छता अधिक्षकांना याची माहिती दिली. यानंतर दोघेही नगरसेवक कांचन माहेश्वरी यांच्या कार्यालयात पोहचले. याठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिकाला बोलावून त्याला त्याचे दहा लाख रुपये परत दिले.