सहाय्यक पोलिस निरीक्षकावर एकतर्फी प्रेम, तिनं केली 50 लाखाच्या खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील एका सहायक निरीक्षकास एकतर्फी प्रेमप्रकरणातून 50 लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी न दिल्याने महिलेने लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे देखील समोर आले आहे. त्यानुसार महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 39 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनाली सोनवणे, राहूल वेताळ, रत्नमाला भगवान वेताळ, मालन गणेश पवार आणि विकास इश्वर तुपे यांच्याविरोधात भादवी कलम 386, 387, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पोलीस दलात कर्तव्यास होते. त्यावेळी आरोपी महिलेची व त्यांची ओळख झाली होती. ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. त्यातच महिलेचा भाऊ देखील पोलीस खात्यात होता. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक रिलेशन सुरू झाले. त्यामुळे ते अधून-मधून कामानिमित्त फोनवर बोलत असे.

मात्र, या बोलण्यातून आरोपी महिलेचे फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम जडले. पण त्या प्रेमाला फिर्यादींनी नकार दिला. याचा राग आरोपी महिलेच्या मनात होता. त्यातच महिलेने व्यवसायासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास फिर्यादींनी नकार दिला. त्यावेळी महिलने साथीदारांसोबत कट रचून तक्रारदार यांना तुमच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेल, तुमची नोकरी घालवेल, तुम्हाला रस्त्यावर आणेल, अशी धमकी दिली. त्यांना 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच, ऍमनोरा सोसायटीतील किंवा हडपसर येथील फ्लॅट नावावर करून देण्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादींच्या पत्नीला शिवीगाळ केली. त्यांना तुझ्या पतीला हडपसरमध्ये राहू देणार नाही. कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या देखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.