आजपासून देशभरात प्लास्टिक बंदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून देशभरात देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. 2022 पर्यंत देशात पूर्नवापर न होणारे प्लास्टिक पूर्णपणे संपवण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. शहरे आणि खेड्यांमध्ये पूर्नवापर न होणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वापरामुळे भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये गणला जातो.

प्लास्टिक बंदीबाबत सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सध्या प्लास्टिकच्या हँडलवाल्या आणि बिना हँडलवाल्या बॅग, प्लास्टिकची कटलरी, कप, चमचे, ताटं याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताटं, खोटी फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पर्यावरण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

स्वातंत्र्यदिनी केली होती घोषणा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाला संबोधित करतांना 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशातील जनतेला प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Visit : Policenama.com