चिमुकलीच्या डोक्यात अडकला ‘कुकर’, डॉक्टरांनी असं वाचवलं

राजकोट : वृत्तसंस्था – एक वर्षाच्या मुलीने खेळताना कुकर डोक्यात घालून घेतला. हा कुकर निघत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. मुलीच्या डोक्यातून कुकर काढणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अथक परिश्रमानंतर डॉक्टरांनी तिच्या डोक्यात अडकलेला कुकर काढला. ही घटना भावनगरमधील असून या मुलीवर सर टी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले.

प्रियांशी वाला या एका वर्षाच्या मुलीच्या डोक्यात हा कुकर अडकला होता. खेळता खेळता मुलीने कुकर डोक्यात घालून घेतला. मोठे प्रयत्न केले पण कुकर काही निघाला नाही. त्यातच तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि सूजही आली. त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये धाव घेतील, असे प्रियांशीच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मुलीच्या डोक्यात अडकलेला कुकर काढण्यासाठी मुलांच्या डॉक्टरांपासून ते अस्थिरोग तज्ज्ञांपर्यंत सर्व डॉक्टर एकत्र आले. पण त्यांना कुकर काढता आला नाही. अखेर भांड्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीला बोलावण्यात आले. त्याने कटरच्या सहाय्याने कुकर कापला आणि तिला मुक्त केलं. यात मुलीला कुठलीही इजा झाली नाही. अशी माहिती सर टी हॉस्पिटलचे प्रशासक हार्दिक गथानी यांनी दिली.

कुकर काढला असला तरी तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मुलीच्या मेंदुला आणि मणक्याला होणारा रक्तपुरवठा सुरळीत आहे की नाही, ते तपासण्यात आलं आहे. या तपासणीत काही आढळून आलं नाही. सर्वकाही व्यवस्थितीत आहे, असे स्पष्ट झाल्यानंतर मुलीला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला, असं हार्दिक गथानी यांनी सांगितलं.