बाजारात लवकरच 30 रुपये किलो दरानं विकला जाईल कांदा ! NAFED नं सांगितली योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आता लवकरच बाजारात स्वस्त कांद्याची विक्री सुरू होणार आहे. NAFED ने यासाठीच्या योजनेवर काम सुरू केले आहे. त्याचबरोबर NAFED चे संचालकांनीही पुढील दहा दिवसांत राजस्थानातून कांदा येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यानंतर कांद्याचे दर स्वतःच खाली येतील. दुसरीकडे NAFED आपल्या गोदामांमधून इतर राज्यात कांदा पाठवू लागला आहे. यशस्वी स्टोअरमधून परवडणारे कांदेही विकले जात आहेत. कांद्याचे काही पीक खराब झाल्यामुळे कांद्याच्या भावात हा मोठा फरक दिसून येत असल्याचे NAFED च्या संचालकांनी सांगितले आहे.

21 रुपये प्रति किलो दराने कांदे पाठवेल NAFED

NAFED चे संचालक अशोक ठाकूर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, कांदा लवकरच 21 रुपये किलो दराने राज्यांना पाठविला जाईल. यानंतर वाहतूक आणि इतर खर्चाची भर घालून राज्यांना तो कांदा बाजारात स्वत: च्या किंमतीनुसार विक्री करता येईल. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आम्ही यशस्वी स्टोअरमध्ये कांदा 28 रुपये प्रति किलो दराने विकत आहोत. तज्ञांच्या मते, नाफेडकडून 21 रुपये कांदा मिळाल्यानंतर, राज्य आपल्या खर्चाची भर घालून प्रति किलो जास्तीत जास्त 30 रुपये दराने कांदा विकू शकेल.

केंद्र सरकारकडे आता कांदा बफर स्टॉकमध्ये केवळ 25 हजार टन कांदा शिल्लक आहे, जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपेल. नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कांद्याचे दर कमी करण्यासाठी नाफेड कांद्याचा बफर स्टॉक उतरवत आहे. गेल्या काही आठवड्यात कांद्याचे दर प्रति किलो 75 रुपयांवर गेले आहेत.

कांद्याचा बफर स्टॉक नाफेड केंद्र सरकारने तयार आणि व्यवस्थापित केला आहे, जेणेकरून आवश्यकतेनुसार ते वापरता येईल. यावर्षी नाफेडने बफर स्टॉकसाठी 1 लाख टन कांदा खरेदी केला होता. आता याचा वापर कांद्याच्या दरांवर लगाम घालण्यासाठी केला जात आहे.