ती युवकाला ऑनलाइनच ‘भावली’, पाहण्यासाठी गेल्यानंतर ‘मरे’पर्यंत मारहाणच झाली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – माढा तालुक्यातील भोगेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन पसंत पडलेल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या नवरदेवाचा मारहाण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी मल्हारी बाळू पालवे (वय १९, रा. मलवडी) या आरोपीला ताब्यात घेतले असून अद्याप ९ जण फरार आहेत. अहमद अब्दुल्ला शेख (वय ५५) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद शेख यांना नवरी पाहण्यासाठी बोलावण्यात आले असता त्यांना धमकी देत सोने व मौल्यवान वस्तू घेत त्यांना लुबाडण्यात आले, त्यानंतर बेदम मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी मल्हारी पालवे याला मंगळवारी पंढरपूर येथून अटक केली. ही घटना शनिवार, ७ डिसेंबर सकाळी अकरा वाजता घडली होती. याप्रकरणी जखमी राजेंद्र पेठे यांनी फिर्याद दिली आहे.

करमाळा तालुक्यात अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या होत्या. पण त्यात फक्त लूट झाली होती. मात्र, यावेळी आरोपींनी लुटीसह व्यक्तीचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णीसह करमाळा पोलिसांचेही पथक तयार केले आहे.

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, प्रवीण साठे, योगेश चितळे, मनीष पवार यांच्या पथकाने तपास करीत मंगळवारी पंढरपूर येथे सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. मात्र, यामध्ये आणखी नऊ ते दहा नावे समोर येण्याची शक्यता आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/