दसरा गाजणार Online मेळाव्यांनी, संघ, शिवसेना, भक्ती गड आणि दीक्षाभूमी ! नेत्यांचं हायटेक सिमोल्लंघन !

मुंबई : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला सुरूवात झाली असून सरसंघचालक स्वयंसेवकांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा यांचा भगवान भक्तिगडावरील मेळावा यंदा ऑनलाईन होणार आहे. पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. तर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे. तसेच नागपूरच्या ऐतिहासिक दीभाभूमीतील धम्मचक्रप्रवर्तन दीन कार्यक्रमात ऑनलाईन दर्शन होणार आहे.

कोरोनामुळे यंदाचे सर्व दसरा मेळावे ऑनलाइन होणार आहेत. सोशल मीडियावर विचारांची लयलूट होणार आहे. हे हायटेक सिमोल्लंघन लक्षवेधी ठरणार आहे. नागपूरला सकाळी मेळाव्याची सुरूवात झाली आहे. यावेळी सरसंघचालकांचं भाषण होणार आहे. मोजक्या स्वयंसेवकाच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात उत्सव आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेच्या स्थापनेपासून दसर्‍याला संध्याकाळी शिवाजी पार्कवर होणार्‍या मेळाव्याचा नियम प्रथमच बदलला असून यंदा पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन भाषण करणार आहेत. यावेळी ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. संध्याकाळी 7 वाजता ते संबोधित करणार आहेत.

पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे लक्ष
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दरवर्षी गाजतो. भगवान गडावर मेळाव्या घेण्यावरून वाद झाल्याने त्यांनी सावरगावला भगवान बाबांच्या जन्मगावी भक्ती गड निर्माण केला आहे. या गडावरून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

दीक्षाभूमी सोहळा सुद्धा ऑनलाइन
आजचा आणखी एक लक्षवेधी सोहळा म्हणजे नागपूरच्या ऐतिहासिक दीभाभूमी मैदानावर होणारा धम्मचक्रप्रवर्तन दीनाचा कार्यक्रम होय. आजच्या दिवशी पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून लोक नागपूरला येत असतात. मात्र यावेळी हा सोहळा रद्द केला असून ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे.