लॉकडाउन म्हणजे नोटाबंदीपेक्षा मोठी चूक,अभिनेता कमल हसन यांची PM मोदींवर टीका

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन केला आहे. मात्र या लॉकडाउननुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांच्या तर पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विविध क्षेत्रातील नोकर्‍या देखील आता धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी या लॉकडाउनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या यादीत अभिनेता कमल हसन देखील आहेत. लॉकडाउन तर नोटाबंदी पेक्षा मोठी चूक असे म्हणत कमल हसन यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. लॉकडाउनचा निर्णय मला पटलेला नाही. लॉकडाउन करुन तुम्ही नोटाबंदीपेक्षा मोठी चूक केली आहे असे मला वाटते. 23 मार्चला मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये मी तुम्हाला विनंती केली होती, की लॉकडाउन करु नका. अन्यथा देश आर्थिक संकटात सापडेल. मात्र तुम्ही तेच केले ज्याची भीती होती. आज गरीबांकडे दोन वेळेचे अन्न नाही. देशातील लाखो लोक आज बेरोजगार होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. परंतु तरीही जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला.

मात्र तुमचा निर्णय पुर्णपणे चुकला असे मला वाटते. अशा आशयाचे पत्र कमल हसन यांनी नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. या पत्राची एक कॉपी त्यांनी ट्विट केली आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरुन देशात मतमतांतर सुरु आहेत. करोना विषाणूला रोखण्याचा एकमेव पर्याय म्हणून काही लोक मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत आहेत. तर काही लोक देशाच्या अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती दाखवून लॉकडाउनवर टीका करत आहेत. हसन यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रितिक्रिया दिल्या आहेत.