यंदा राज्यसभेत विरोधकांची होणार ‘पावर’ कमी, काँग्रेसच्या 9 जागा होऊ शकतात कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चालू वर्षांत राज्यसभेतील विरोधी पक्षांची ताकद कमी होणार आहे. कारण या वर्षी एकूण ६८ जागा रिक्त होणार आहेत. या जागा भरण्यासाठी निवडणुकीत काँग्रेसला आपल्या काही जागांवर नुकसान होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये काँग्रेसची काहीच ताकद नसल्यामुळे त्यांना वरिष्ठ सभागृहामध्ये १९ पैकीं ९ जागा गमवाव्या लागतील.

अशी सुद्धा चर्चा सुरू आहे की, काॅंग्रेस प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सुरजेवाला या बड्या नेत्यांना राज्यसभेवर आणण्याचा विचार करीत आहे. काँग्रेसला आपण ९ जागा जिंकू असा विश्वास असून मित्रपक्षांच्या साथीने अधिक दोन ते तीन जागा जिंकू शकतात.

काँग्रेस सध्या छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सत्तेवर आहे. एप्रिल, जून आणि नोव्हेंबर मध्ये रिक्त ६८ जागा भरण्यासाठी निवडणूका होतील व त्यामुळे विरोधी पक्षाची ताकद कमी होणार असून सत्ताधारी पक्षासाठी बहुमताकडे जाण्यास ही निवडणूक फायदेशीर आहे.

एप्रिल मध्ये राज्यसभेतल्या ५१ जागांवर निवडणूक होणार आहे. मोतीलाल व्होरा, मधुसूदन मिस्त्री, कुमारी शैलजा, दिग्विजय सिंह, बी के हरिप्रसाद आणि एम वी राजीव गौडा या वरिष्ठ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल आणि जूनमध्ये समाप्त होणार आहे. त्यामधील शैलजा, व्होरा आणि दिग्विजय सिंह यांना पुन्हा निवडणूक लढवायला सांगण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त काँग्रेस नेता राज बब्बर आणि पीएल पुनिया हे अनुक्रमे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश मधून उभे राहण्याची शक्यता कमी आहे, कारण तिथे भाजपचे सरकार आहे. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश मधून १० जागा रिक्त होणार आहेत. महाराष्ट्रातून ६ जागा रिक्त होणार असून त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेचा समावेश आहे. तामिळनाडूमधून ६ जागा तसेच पश्चिम बंगाल, बिहार मधून ५ जागा तर गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून ४ जागा रिकाम्या होणार आहेत.

काँग्रेस राजस्थानमधून आणि मध्य प्रदेश मधून तीन पैकी दोन, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून प्रत्येकी १ जागा जिंकेल, आणि मेघालय, आसाम, तेलंगणा व आंध्र प्रदेश मधून काँग्रेस पक्ष जागा गमावू शकतो.

सत्तारूढ पक्षाकडे राज्यसभेत बहुमत नसून वरिष्ठ सभागृहात महत्वपूर्ण कायदे पारित करण्यासाठी अण्णाद्रमुक आणि बीजद यांचे समर्थन घ्यावे लागते.

राज्यसभेत भाजपाकडे सर्वाधिक ८२ सदस्य असून काँग्रेसकडे ४६ सदस्य आहेत. राज्यसभेत एकूण २४५ सदस्य संख्या आहे. १२ सदस्य नामनिर्देशित असून त्यातील ८ हे भाजपशी संबंधित आहेत.