ACP Transfer News : ठाण्यातील 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. वागळे इस्टेट विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश निलेवाड आणि डोंबिवलीचे जयराम मोरे आदींचा यामध्ये समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षकांच्या आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या रखडल्या होत्या. गृहविभागाने या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश 1 ऑक्टोबर रोजी काढले होते. यामध्ये तब्बल 105 अधिकाऱ्यांपैकी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला सहा सहाय्यक आयुक्तांची तर ठाणे ग्रामीणसाठी दोन आणि पालघर जिल्ह्यासाठी एका उपअधीक्षकाच्या नियुक्तीचे आदेश गृहविभागामार्फत काढण्यात आले. ठाणे शहर मधील चार तसेच इतर अशा दहा सहाय्यक आयुक्तांना नियुक्तीचे आदेश पोलीस आयुक्त फणसळकर यांनी काढले आहेत.

वागळे इस्टेट विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेवाड यांची बदली विशेष शाखा -1 मध्ये करण्यात आली आहे. तर विशेष शाखेचे बजबळे यांना निलेवाड यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासन विभागातील दत्ता तोटेवाड यांची उल्हासनगरच्या वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मुख्यालयातील उमेश पाटील यांनाही कल्याणच्या वाहतूक शाखेत नियुक्ती मिळाली आहे. सध्या मुख्यालय एकचा अतिरिक्त कार्यभाग सांभाळणारे जयराम मोरे यांचीही पुन्हा डोंबिवली विभागात बदली करण्यात आली आहे.

याशिवाय ठाणे जात पडताळणी विभागाच्या उपअधीक्षक संगीता अल्फान्सो यांना ठाणे शहर नियंत्रण कक्षात नियुक्ती मिळाली आहे. तर डहाणू येथून आलेल्या मंदार धर्माधिकारी यांना मुख्यालय -2 मध्ये नियुक्त करण्यात आले आहे. गोंदियाचे उपअधीक्षक प्रशांत ढोले यांना भिवंडी पूर्व, तर सोनाली ढोले यांना प्रशासन विभागात नियुक्त करण्यात आले आहे. औरंगाबदच्या कन्नड येथून आलेल्या जगदीश सातव यांना मुख्यालय-1 च्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती दिल्याचे आदेशात म्हटले आहे.