उस्मानाबाद : राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅलीत चोरट्यांचा डल्ला

पाच लाखांसह, मोबाईल, दागिन्यांची चोरी

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. उमेदवारांची घोषणा झाली आणि आता प्रचार सभा, रॅलींना वेग आला आहे. उस्मानाबादेत राणा जगजितसिंह पाटील यांच्या रॅलीत मात्र चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. या रॅली दरम्यान चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये रोख, मोबाईल फोन, सोन्याचे लॉकेट लांबवले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद मध्ये काल (२६मार्च) रोजी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. सुमारे तासभर चाललेल्या या रॅलीमध्ये चोरट्यांनी पंधरा जणांचे खिसे कापले. त्यात सुमारे पाच लाख रुपये रोख, मोबाईल फोन, सोन्याचे लॉकेट चोरट्यांनी पळवले. दरम्यान या घटनांची शहर आणि ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर या रॅलीमध्ये दोन संशयितांना कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला आणि नंतर पोलीसांच्या हवाली केलं.

उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह पाटील हे महाआघाडीचे उमेदवार आहेत. तर ओमराजे निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.