सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तलाठी महिलेची 34 हजारांची मागणी, 25 हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

उस्मानाबाद, दि. 23 – सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 34 हजाराची लाच मागून त्यापोटी 25 हजाराची लाच घेणाऱ्या उस्मानाबादच्या तलाठी महिलेवर एसीबीने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील दत्तनगर येथील तक्रारदारास त्याचे व त्याच्या आजोबाच्या प्लॉटची नोंद सातबारा उताऱ्यावर घ्यावयाची होती. तांत्रिक अडचणीचे कारण देत तलाठी महिलेने काचेच्या अपेक्षेने नकारात्मकता दर्शविली. त्यानंतर त्या कामासाठी 34 हजार रुपये द्यावे लागतील, असे तिने सांगितले. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी रीतसर उस्मानाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधात्मक कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना तलाठी महिलेस रंगेहाथ पकडून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.