ओवैसींचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले -‘आतापर्यंतचं सर्वात अवैज्ञानिक सरकार…’

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थित देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. या परिस्थितीवरुन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. विरोधक कोरोनावरुन मोदी सरकारवर टीका करत असताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत कोरोना स्थितीवरुन सवाल उपस्थित केले आहेत.

केंद्र सरकारवर टीका करताना ओवैसी म्हणाले, केंद्र सरकार आतापर्यंतचे अवैज्ञानिक सरकार आहे. पहिल्या लाटेनंतर सरकारनं स्वत:च्या विजयाची घोषणा केली आणि स्वत:च स्वत:ला शाबासकी देखील दिल्याचे ते म्हणाले. त्यांचे सल्लागारच तिसऱ्या लाटेबद्दल गोंधळलेल्या स्थितीत आहेत. सरकारच्या आदेशावर वैज्ञानिक आपली स्थिती बदलत आहेत का ? असा सवाल ओवैसी यांनी केला. केंद्र सरकारचे मुख्य सल्लागार विजय राघवन यांच्या वक्तव्यानंतर औवैसी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली.

ओवैसी यांनी ट्विटद्वारे सर्वोच्च न्यायालयाद्वारे नेमलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सच्या स्थापनेवरून निशाणा साधला. जर सरकार दुसऱ्या लाटेसाठी तयार असतं आणि त्यांची वागणूक निष्काळजीपणाची नसती तर याची गजर पडली नसती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरुन सरकार घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य कसे खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे हे दिसून येते. कार्यकारी क्षेत्रात न्यायालयाचा हा एक प्रकराचा हस्तक्षेप असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.