या नेत्याने करून दिली पाकिस्तानला जिनेव्हा कराराची आठवण 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले आहे. या हल्‍ल्‍याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्‍या बालाकोटमध्‍ये जाऊन हवाई हल्‍ला केला आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्‍या तळांना नेस्‍तनाबूत केले. तसेच पाकिस्तानी फायटर विमानांवर प्रतिहल्ला करताना बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जीनेव्हा कराराचा आदर करुन नियमांचे पालन करावे असे ओवेसी यांनी म्हटले आहे. या कठिण काळात हवाई दलाचा तो शूर वैमानिक आणि त्याच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो असे असदुद्दीन ओवेसी ट्विट करून म्हटले आहे.

जीनेव्हा कराराच्या कलम ३ मध्ये दोन्ही पक्षांनी कैद्यांना मानवतेची वागणूक दिली पाहिजे असे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने सुद्धा याच कलमातंर्गत हवाई दलाच्या वैमानिकाला मानवतेची वागणूक दिली पाहिजे असे ओवेसी म्हणाले. पाकिस्तानने आज सकाळी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या सर्तक असलेल्या हवाई दलाने त्यांचा प्रयत्न उधळून लावला आहे.

पाकिस्तानी फायटर विमानांवर प्रतिहल्ला चढवताना भारताचे एक मिग-२१ विमान कोसळले व वैमानिक बेपत्ता झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या वैमानिकाचे नाव अभिनंदन वर्थमान असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. सदर व्हिडीओची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

https://twitter.com/asadowaisi/status/1100700004690227201