अमेरिकेच्या दबावापुढे PAK झुकला, पत्रकार डॅनियल पर्लच्या मारेकऱ्यांना सोडण्यापूर्वीच पुन्हा अटक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला असून पत्रकार डेनियल पर्लच्या मारेकऱ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या उच्च न्यायालयाने पर्लच्या हत्येचा मुख्य आरोपी आणि अल कायदाचा दहशतवादी अहमद ओमर सईद शेख याची फाशीची शिक्षा रद्द करून सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यासह अन्य तीन आरोपी फहद नसीम, सलमान साकीब आणि शेख मोहम्मद आदिल यांना सोडून देण्यात आले होते. तिघांनाही सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.कोर्टाच्या या निर्णयाचे अमेरिकेने ‘नंदनीय’ असे वर्णन केले होते. 2002 मध्ये कराचीमध्ये पर्लच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी ओमर सईद शेख मागील 18 वर्षापासून तुरुंगात आहे.

सिंध प्रांतच्या सरकारने दिलेल्या आदेशानुसार, मुख्य आरोपी उमर सईद शेख, फहद नसीम अहमद, सलमान साकीब आणि सेख मोहम्मद यांना अटक करून तीन महिन्यांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना पुन्हा अटक करण्यासाठी सरकारकडे तसे कारण आहे. चौघांना तुरुंगातून सोडण्यापूर्वीत अटक करण्यात आली आहे. हे चौघेजण देशाच्या विरोधात विरोधात काम करू शकता अशी भीती अधिकाऱ्यांना आहे.

अमेरिकन आयोगानेही नाराजी व्यक्त केली
आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्र्याशी संबंधित आयोगाच्या अमेरिकेतील कमिश्नर अनुरीमा भार्गव यांनी म्हटले आहे की, पर्लच्या हत्येच्या दोषींना शिक्षा करण्यास पाकिस्ताने रस दाखवला नाही हे कोर्टाच्या निकालावरून दिसून येत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अमेरिकेच्या नॅशनल प्रेस क्लब आणि नॅशनल प्रेस क्लब जर्नालिझम इन्स्टिट्यूटने पर्ल हत्येप्रकरणी दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात केली आहे.