पंकजा मुंडे यांनी ‘या’ भावाबरोबर साजरी केली भाऊबीज

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वीच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी वेळी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याच चुलत बहीण भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा ३० हजार ७०१ मतांनी दारुण पराभव केला. पंकजा यांचा हा पराभव धक्कादायक आहे असं मत मुख्यमंत्र्यांनाही व्यक्त केले आहे. दरम्यान पराभवानंतर पंकजा मुंडे या मुंबईतील घरी परतल्या असून त्यांनी मुंबईतच दिवाळी साजरी केली. मंगळवारी पंकजा यांनी भाऊबीज राज्यातील मंत्री महादेव जानकरांचे औक्षण करुन साजरी केली. मागील अनेक वर्षांपासून जानकर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकाजा यांच्या घरी जातात.

दरम्यान पंकजा यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन अनेक कार्यकर्त्यांनी पंकजा यांना शुभेच्छा दिल्या. हा पराभव पंकजा यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे. पराभवानंतर पंकजा यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत लिहिले कि, “माझा पराभव मी मान्य केला असून माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. हे सर्व कस झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन. आता या विषयाला सर्वांनी विराम देत, कोणी कोणावर आरोप-प्रत्यारोप करू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबासमवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच, तो अंतिम असतो बस्स!”.

दरम्यान दुसरीकडे धनजंय मुंडे यांनी आपल्या विजयाचा आनंदाबरोबरच पंकजा यांच्या पराभवाचे दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले कि, “माझ्या अंगाला विजयाचा गुलाल लागावा, अशी इच्छा होती. आज मात्र माझ्या अंगाला लागलेला गुलाल बघायला ते नाहीत. मला जनतेनं खुप प्रेम दिलं. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एकीकडं या विजयाचा आनंदही आहे आणि दुसरीकडं खंतही आहे. कारण त्या मानत नसल्या तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्तीचा हा पराभव आहे. त्यामुळे मनात खंत आहेच,”

दरम्यान, पंकजा यांचा परळीमध्ये पराभव झाला असला तरी विधानपरिषदेमध्ये पंकजा यांना संधी देऊन त्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Visit : Policenama.com