काँग्रेस ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी काँग्रसचं पिल्लू : पंकजा मुंडे

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार जोरात सुरु आहे. त्यात नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचे पिल्लू आहे, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. नांदेड लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेडमधील मुखेड येथे सभा घेण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. यांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात डिव्हाईड अॅन्ड रुल ही पॉलीसी राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याच काँग्रेसचे पिल्लू आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ब्रिटीश भारतात व्यवसाय करण्यासाठी आले होते. व्यवसाय करता-करता त्यांनी १५० वर्ष भारतावर सत्ता गाजवली. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सत्तेमध्ये व्यवसाय केला, त्यामुळे लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

सुरुवातीला जनतेकडे काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता. परंतु भारतीय जनता पार्टी ही एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहिली, तेव्हा या काँग्रेवाल्यांनी ब्रिटिशांप्रमाणे डिव्हाईड अॅन्ड रुल ही पॉलीसी राबवली. भारतीय जनता पक्ष हा अल्पसंख्यांकांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार करुन काँग्रेसवाल्यांनी देशात उभी फूट पाडली. तर राष्ट्रवादी हे त्यांचेच पिल्लू आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी जाती-जातींमध्ये समाजाचे तुकडे केले, असा आरोपही त्यांनी यावेळी लावला.

दरम्यान, नांदेडमध्ये प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अशोक चव्हाण रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.