‘मृत’ समजून मुलानं आईला केलं ‘दफन’, 3 दिवसांनी ‘जिवंत’ बाहेर आली महिला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर चीनमधील पोलिसांनी तीन दिवसांनंतर एका महिलेला कब्र मधून जिवंत बाहेर काढले आहे. या महिलेच्या मुलावर असा आरोप आहे की त्याने आपल्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिचा मृत्यू झाला असे समजून पुरले. तीन दिवसानंतर महिलेस बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. आरोपी व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिने पोलिसांना सांगितले की 2 मे रोजी तिचा नवरा त्याच्या आईला गाडीत घेऊन गेला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही तेव्हा तिला संशय आला.

आरोपी व्यक्तीच्या पत्नीकडून अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आणि त्याच्या आईबद्दल त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचे वास्तव समोर आले. या आरोपीने त्याच्याच 79 वर्षीय आई वांगला जिवंत दफन केले होते.

शेजारच्या लोकांनी ऐकला होता आवाज

आसपासच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती व्यक्ती महिलेला गाडीत घेऊन जात होती, तेव्हा ती विव्हळत होती. तसेच वाचवण्यासाठी आवाज देखील देत होती. अनेक वृत्तपत्रांनी असे लिहिले आहे की पोलिस खात्याकडून त्यांना या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान मिळालेले नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्याविषयी कोणतीही माहिती देता येणार नाही.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, महिलेला अर्धांगवायू झाला होता आणि तिचा मुलगा तिची काळजी घेता घेता कंटाळला होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले, असे सांगण्यात येत आहे.